रायगड परिक्रमा – अजित पेंडसे

रायगड… महाराष्ट्राचे तीर्थस्थान; “गड बहुत चखोट” असे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी गौरविलेले, हिंदुस्थानचे प्रेरणा स्थान. असा हा दुर्गदुर्गेश्वर रायगड, माझ्या सारख्या दुर्ग आणि डोंगर भटक्यांसाठी कायमच आकर्षणाचा केंद्र बिंदू राहिला आहे. त्यामुळे “रायगड परिक्रमा” मोहिमेकडे मी आकर्षित झालो नसतो तरच नवल!

शुक्रवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी रात्री पुण्यातून प्रयाण करून आम्ही १५ जण हिरकणीवाडी येथे शनिवारी पहाटे ४ वाजता पोचलो. धो-धो कोसळणाऱ्या पावसाने आमचे स्वागत केले. आणि त्या पावसाने बहुतेकांची झोपही उडवली. एवढ्या पावसात पुढे जाण्याबद्दल काहीजण साशंक होते. सुदैवाने तासाभरातच पावसाने विश्रांती घेतली आणि सर्व शंका दूर झाल्या. पावसाळी कुंद वातावरणात उजाडू लागले होते. वाफाळता चहा आणि मिसळीचा आस्वाद घेऊन परिक्रमा मार्गाला लागलो. देवळात प्रदक्षिणा मारताना देवाचे जसे स्थान, तसेच परिक्रमा करताना रायगडाचे. अर्थात परिक्रमा मार्गावर रायगड कायमच आमच्या उजव्या हाताला असणार होता.

हिरकणीवाडी मधून सकाळी ७ वाजता सुरुवात केल्यानंतर पहिलाच थांबा सुमारे १ कि.मी वर होता – नाचणं टेपाची गुहा अर्थात वाघ बीळ. रायगड खिंडीमध्ये, रायगड पाठीशी ठेऊन काही मिनिटातच वाघबीळ गाठले. गुहेत पोचल्यावर समोरच २ कातळ-भोके नजरेस पडली. पाचाड गाव आणि रायगड खिंडीवर लक्ष ठेवण्यासाठी ह्याचा उपयोग केला जायचा अशी माहिती विशालने दिली. “ओळख परेड” झाल्यावर पुढच्या टप्याच्या सूचना विशालने दिल्या आणि खऱ्या अर्थाने परिक्रमेची सुरुवात झाली. रायगडवाडी च्या दिशेने चालत असताना ढगांचा पडदे दूर झाले आणि रायगडचे दर्शन झाले.

“चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गाव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे.” ह्याचा प्रत्यय आला. तोंड आभाळाकडे करूनच टकमक टोकाची भव्यता नजरेत सामावून घेता येत होती. रात्रीच्या पावसामुळे प्रवाहित झालेले प्रपात नजर खिळवून ठेवत होते. हिरवीगार शेते आणि निसर्गातल्या हिरव्या रंगाच्या विविध छटा नेहेमी प्रमाणेच नजर तृप्त करून गेल्या.

इथून पुढे जंगलातली वाट चालू झाली. वाटेतल्या रायनाक समाधीचे दर्शन घेऊन तीनच घरे असलेल्या धनगर वस्तीत पोचलो. वस्तीतल्या घरातील लक्ष्मी पाटा वरवंट्यावर खेकड्याच्या कालवणाची तयारी करत होती. “आता इथेच जेवण करून जाऊ” असा आग्रह चालू झाला. 😃 वस्तीतल्या दादांशी गप्पा मारून पुढे वाटचाल सुरु झाली. आडव्या तिडव्या रानातून, उंच कारवीतून जाताना मध्येच रायगड दर्शन होत होते. डाव्या बाजूला खोलवर काळ नदीची सोबत होतीच. मला स्वतःला काळ नदीच्या पलीकडे दिसणाऱ्या पर्वत रंगांची माहिती घेण्यात जास्त रस होता. पानशेत बाजूने येणाऱ्या बऱ्याच घाटवाटा ह्या बाजूने कोकणात उतरतात. विशालकडून त्याची माहिती घेतली. ह्या डोंगर रांगांनी ढगांची चादर पांघरल्यामुळे लिंगाणा कुठे असेल ह्याचा अंदाज येत नव्हता. पण दैव बलवत्तर. ढगांनी बाजूला होऊन लिंगाणा दर्शन घडवले.

वाटचाल सुरु होऊन आता ४ तास उलटून गेले होते. काटेरी वाटांमधून चालताना फांद्यांची जाळी “रांगत” आणि “डक वॉल्क” करत चुकवताना मंडळींचा सकाळचा नाश्ता केव्हाच जिरून गेला होता. साहजिकच बरोबर आणलेल्या शिदोर्या आणि भूक-लाडूचे डबे उघडले गेले. त्यावर ताव मारून पुढे निघालो. आणि “वाघोरी (वाघोली)” खिंडीचा छातीवर येणारा चढ सुरु झाला. पहिलाच ट्रेक करणाऱ्या दोघा-तिघांनी, इतर सर्वांबरोबर खिंड सर केली. अगदी थोड्या वेळात, घाम काढणारा पण भरपूर उंची गाठून देणारा हा अनुभव त्यांच्या बरेच दिवस लक्षात राहणार हे नक्की. खिंडीमध्ये सगळे एकत्र जमले तेव्हा १२ वाजून गेले होते.

पुढचं रस्ता तीव्र उताराचा होता. “ह्या पेक्षा चढ बरा होता” अशी प्रतिक्षिप्त क्रिया उमटली. थोडे सपाटीला आल्यावर पुन्हा जंगलाचा, ओढ्याचा आणि काट्या-कुट्यांचा रास्ता सुरु झाला. दाट झाडीतून वाट काढताना आणि बाणाच्या खुणेचा “मार्किंग” शोधताना मजा येत होती. पोटल्याचा डोंगर दिसायला लागल्यावर ट्रेकचा उत्तरार्ध सुरु झाला आहे ह्याची जाणीव झाली. पण शेवटचे आव्हान बाकी होते ते “काळकाई” खिंडीचे. वाघोरी खिंडीच्या मानाने कमी थकवणारी खिंड चढलो आणि अचानक डांबरी रास्ता लागला. “रायगड रोप वे” च्या ट्रॉलीज चि मजा बघत बघत हिरकणी वाडी मध्ये ३ च्या सुमारास परिक्रमेची सांगता झाली.

चिखलाने माखलेले कपडे बदलले, जेवणावर ताव मारून पुण्याकडे मार्गस्थ झालो. पाचाडचा वाडा आणि राजमाता जिजाबाई साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

पाचाडचा वाड्यातून लांबवर दिसणारा आणि ढगांचे आच्छादन घेऊन मिरवणारा रायगड सर्वांनाच समाधान देऊन गेला.
Ajit Pendse
Written By

Ajit Pendse

Spread the love of Adventure Travel

Share this article

7 Responses
  1. Kailas Yadav

    Truly phenomenally described Raigad.
    || छत्रपती शिवाजी महाराज की जय ||

  2. Sayali Bhase

    Thanks Ajit Sir, parat ekda Raigad pradakshina ghadavlya baddal☺️

    Khup chan lihla ahee, agdi ramun gele mele mi pradakshine madee…
    Please ashe blog lihne continue kara…
    Parat bhetu… Trek la 🤗

Leave a Reply

Contact Us
Hello, Welcome to SG-Trekkers!
Say Hi to us!WhatsApp
Mon-Fri, 08:00-20:00 hrs. (IST)Call us onPhone
Email UsEmail