आज एक वर्ष उलटून गेलं, सह्यभटकंतीची ओढ लागलेल्याला.
भरपूर प्रेम दिलं सह्याद्रीने. खूप काही शिकवलं. त्यामुळे सर्व सह्याप्रेमींना उद्देशून एक कविता लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
सह्याद्रीची महानता मी शब्दांत मांडू शकणार नाही, जे काही थोडंफार अनुभवलंय आणि अनेक सह्यभटक्यांचे अनुभव वाचलेत त्यातून हा छोटासा प्रयत्न. काही चुकलं तर क्षमा असावी आणि काही बदल असतील तर सुचवावे. धन्यवाद!
सह्याद्रीला सर्वस्व मानणाऱ्या सर्वांना अर्पण.
बारमाही, तिन्ही ऋतू, उन्ह-वारा-पाऊस झेलत ताठ मानेने उभे राहून,
सर्व संकटांना सामोरे जात संघर्ष कसा करायचा ना ह्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण देतो हा सह्याद्री ।।
गगनाला भिडायच्या इराद्याने कितीही उंच उडालो तरी पाय जमिनीवरच असायला हवे हाच उपदेश देतो हा सह्याद्री ।।
जीवनाच्या दिशा अस्पष्ट होत असताना आशांची नवी किरणे देतो सह्याद्री ।।
झाडाझुडपांना तालावर नाचवून वाऱ्याच्या सोबतीने मधुर गीत गातो हा सह्याद्री ।।
सूर्योदय आणि सुर्यस्थाला नजर उतरावी वाटते त्याची
इतक्या रंगबिरंगी छटांची शाल पांघरतो सह्याद्री ।।
आयुष्याच्या धकधकीमुळे निर्जीव झालेल्यांना,
सिमेंट आणि काँक्रीटच्या जंगलात रोबोट झालेल्यांना त्यांच बालपण आठवून मनमुरादपणे हिंडण्याचं आणि बागडण्याचं हक्काचं स्थान देतो सह्याद्री ।।
स्वतःला भटके म्हणवून घेणाऱ्यांना घराचं घरपण देतो सह्याद्री ।।
बापाचा धाक आणि मायेने कुरवाळत आईची ममता देतो सह्याद्री ।।
बाप्पाच्या मुर्त्या इथे आहेत आणि मलंग बाबाची दरगाह देखील आहे,
एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने नांदण्याचा संदेश देतो सहयाद्री ।।
खरी मजा शिखरावर नाही तर तिथपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात आहे,
हेच गणित आयुष्याशी जोडून, जगण्याचा नवा मार्ग देतो सह्याद्री ।।
स्मार्टफोन च्या जगात इतिहासाच्या पानांना धूळ लागत असताना,
आपल्या वैभवशाली आणि गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतो सह्याद्री ।।
माझ्या राजांनी आणि मावळ्यांनी रक्ताचं पाणी करून,
कपाळावर कफन बांधून मिळवलंय हे स्वराज्य.
त्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची प्रत्येक क्षणाला साक्ष देतो सह्याद्री ।।
दगडात आणि जंगलात काय ठेवलंय अस म्हणणाऱ्यांना सांगतो,
आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे सह्याद्री ।।
फक्त फिरण्याचा नाहीच तर जगण्याचा विषय आहे सह्याद्री ।।
[social-share align=”center” style=”icon” template=”9″ nospace=”yes” animation=”essb_icon_animation14″ counters=”1″ counter_pos=”insidehover” total_counter_pos=”leftbigicon” buttons=”love,whatsapp,facebook,twitter,gmail,copy”]
अप्रतिम सुंदर कविता! अगदी मनातलं सह्याद्रीच प्रतिबिंब कवितेत जागृत झाले आहे.🥰 जय भवानी जय शिवाजी 🚩
सह्याद्री एक प्रेरणा स्थान, अजरामर जिवंत तो देतो नवी पिढीस सामर्थ्य आणि संकटांना निर्भिड पणे सामोरे जाण्याचे बळ!
इतिहास आपण आज आहोत आपल्या पूर्वजांच्या बलिदानामुळे.
अप्रतिम , हृद स्पर्शी
❤️🚩