ट्रेक करत असताना सह्याद्रीच्या डोंगर- दऱ्यांमध्ये आपल्याला जैवविवीधता पाहायला मिळते. त्यापैकीच एक आज निदर्शनास आलेली गोष्ट! मुंग्यांच घरटे!
तर खरोखर या मुंग्यांनी पक्ष्याप्रमाणे झाडावर घरटे बांधलेली दिसली. वरंध घाटा जवळच्या डोंगरात भटकंती करताना दिसलेला एक उत्तम नमुना.
पावसाळा येण्याआधी किंवा अगदी सुरुवातीला या मुंग्या आपली घरटी झाडावर बांधतात. साधारण १०-१५ दिवसांच्या काळात त्याचं घर तयार होत. एकट्या-दुकट्या मुंगीच हे काम नाहीये तर फौजच्या फौज हे काम खूप चिकाटी आणि तत्प्र्तेमे करत असतात. मुंग्यांच्या जातीनुसार त्यांचे काम करायची पद्धत आणि त्या काय काम करतात हे बदलत जाते.
पावसाळ्याच्या आधी विणकर मुंग्या घरटे बनवायच्या मोहिमेला लागतात. यासाठी त्यांना आधी योग्य अशी जागा आणि झाड शोधावे लागते. जेव्हा त्यांना अशी योग्य जागा मिळते तेव्हा ते त्या फांदीवर अथवा पानावर जाऊन, ते पान खेचायला लागतात, दुसऱ्या बाजूने तिकडच्या कामकरी मुंग्या पहिल्या मुंग्यांच्या बाजूला ते पान ओढतात. जर पान खूप मोठे असेल तर २-३ पाने एकत्र गुंफवली जातात. या दोन पानांमधले अंतर जास्त असेल तर या मुंग्या चक्क त्या दोन पानांमध्ये पूल बांधतात. एकमेकांच्या शरीराला कंबरेला धरून त्या या पानाच्या टोकापासून ते दुसऱ्या पानाच्या टोकापर्यंत स्वत:च्या शरीराचा एक मोठा पूल तयार करतात आणि मग हळूहळू ती दोन पाने खेचून एकत्र आणतात.
यानंतर चण्याच्या पुडीसारखे ते पान वाकवले जाते. यानंतरचे मोठे काम असते ते म्हणजे ती पाने एकत्र शिवायचे. या कामाकरता त्या चक्क आपल्या पिल्लांना कामाला जुंपतात. या खास वाढवलेल्या पिल्लांच्या ग्रंथीमधून रेशीम स्रवत असते. या पिल्लांना पाठीला धरून त्या मुंग्या त्यांना पानाच्या कडेवर फिरवतात. यामुळे ती पिल्ले तिथे रेशीम धागा स्त्रवत जातात आणि ती पाने एकमेकांना अगदी शिवल्यासारखी जोडली जातात.
विशेष म्हणजे ती घरटी waterproof असतात.
तर अशा या मुंग्या केवळ चावऱ्या आहेत असे न समजता एकीने राहणाऱ्या, एकमेकांना सांभाळून साथ देणाऱ्या, सामाजिक निसर्गातला एक छोटासा चमत्कार आहे असेच मानावे लागेल.
श्री.विशाल काकडे यांचे, हा उत्कृष्ट लेख लिहिल्याबद्ल त्रिवार अभिनंदन व त्यांना त्रिवार धन्यवाद ! ट्रेकिंग करत असताना सभोवतालच्या निसर्गजीवनाचे सूक्ष्म निरीक्षण व टिपण करण्याची त्यांची अभिजात प्रवृत्ती स्तुत्यच नव्हे तर सर्वांनी अनुकरण करावे अशीच आहे.तसेच त्यांची लेखनशैली ओघवती आहे, भाषा सहजसुंदर आहे, शब्द समर्पक – एक उणा नाही कि एक अधिक नाही- आहेत, वाक्यरचना स्पष्ट आणि निर्दोष आहे.त्यामुळे हा लेख पुन: पुन्हा वाचावासा वाटतो, यातच त्यांच्या लेखनकलेचं यश दिसून येते.
टीप: ट्रेकर्स लोक अभिप्राय लिहिणारे नसावेत, म्हणून अद्याप कोणीआपली मते दिली नसतील.